Akshay Shinde Encounter : बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी फेक एन्काऊंटर, नाना पटोले यांची टीका

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक होता असे न्यायालयाने म्हटले आहे. भाजपने आपल्या बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी हे फेक एन्काऊंटर केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच कुणाच्या आदेशावरून हे फेक एन्काऊंटर केले त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक होता. हे कोर्टाने म्हटल्यानंतर सरकारचे वास्तव समोर आले आहे. सरकार आपल्या बगलबच्यांना वाचवण्याचे प्रयत्न करत होते आणि ही बाब समोर आली आहे. एकीकडे महिला आणि लाडक्या बहिणींवर अन्याय केला जात आहे, यात पोलीस दोषी आहेत. ज्या पोलिसांनी कुणाच्या तरी आदेशावरून हे फेक एन्काऊंटर केले आहे, ते समोर आले पाहिजे, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेसतर्फे आमची मागणी आहे.

पालकमंत्रीपदावरून सुरु असलेल्या वादावर पटोले म्हणाले की, या सरकारमध्ये काही आलबेल नाही, मतांवर डल्ला मारून हे लोक सत्तेवर आले आहे. राज्याची जनता आजही या सरकारला आपलं सरकार म्हणून मानायला तयार नाही. मलईदार जिल्ह्यांसाठी यांची आपसांत भांडणं सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस दावोसला असताना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की आली. यातूनच सरकारमध्ये आलबेल नाही हे स्पष्ट दिसतंय असेही पटोले म्हणाले.