महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय सर्व सहमतीने होईल – नाना पटोले

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय सर्व सहमतीने होईल. 180 जागा महाविकास आघाडीच्या येतील. राज्यात परिवर्तन घडणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

लातूर येथे मराठवाड्यातील काँग्रेसच्या तिन्ही खासदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी आमदार मधुकर चव्हाण, त्रिंबक भिसे,अशोक पाटील निलंगेकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार वसंत चव्हाण, खासदार डॉ. कल्याण काळे, विक्रांत गोजमगुंडे, वजाहत मिर्झा, दीपक सूळ, कल्याण पाटील, कुणाल राऊत, श्रीशैल्य उटगे, किरण जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, महाराष्ट्राची सुरुवात लातूरपासून करत आहोत. लातूरकरांनी अभिमान वाटावा असे काम केले आहे. जनतेपेक्षा कोणी मोठा नाही, हे नांदेडकरांनी जालनेकरांनी दाखवून दिले. विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठवाड्यातील सर्वाधिक जागा निवडून आणल्या पाहिजेत. अहंकारी सत्तेला जागा दाखवण्याचे काम जनतेने केले आहे. सत्ता लाडकी आहे, तिजोरी रिकामी करण्याचे काम सरकार करत आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचे काम केले जात आहे. पण, जनता थारा देणार नाही. लोकसभेत राहुल गांधीला मोदी घाबरतात. खोकेबाज सरकारचे दिवस भरलेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्या. एका ताकदीने एकत्र या. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढावे लागेल. सर्व गुजरातला पळवले जात आहे. महाराष्ट्र  11 व्या नंबरवर नेऊन ठेवला आहे.

आमदार अमित देशमुख यांनी सांगितले की, सत्ताधारी घरे फोडत आहेत. लातुरातील देवघर फोडले. लातूरमधील काँग्रेस कार्यकर्ते अजूनही आमच्या सोबत आहेत. मराठवाड्याचे पालकत्व नेत्यांनी स्वीकारावे. उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे जाळे काँग्रेस पक्षाचे आहे. ती जागा काँग्रेसला सोडवून घ्यावी, अशी मागणी केली. महाराष्ट्रात परिवर्तन घडेल. महाविकास आघाडीचा झेंडा विधानसभा निवडणुकीत फडकेल. महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची गरज आहे, असेही अमित देशमुख यांनी सांगितले. सतेज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धीरज देशमुख यांनी केले. महाराष्ट्रातील जनता हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. मराठवाड्यातील जनतेच्या महाविकास आघाडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे त्यांनी सांगितले. दिलीपराव देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला.