
नागपूरला पेटवण्यात राज्य सरकारच जबाबदार होते, असा हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर केला आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, “नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण नागपूर पोलिसांनी ती हिरवी चादर ताब्यात का घेतली नाही. ती चादर ताब्यात घेतली असती तर ही घटना झालीच नसती. नागपूरला पेटवण्यात राज्य सरकारच जबाबदार होते हे ठामपणे सांगतो.”
नाना पटोले म्हणाले की, “नागपूरची दंगल ज्या भागात झाली त्या भागात मुख्यमंत्री फडणवीस यांचे बालपण गेले आहे. नागपूर शहर हे सर्वधर्म समभाव मानणारे आहे. आजपर्यंत असा प्रकार नागपूरमध्ये झाला नाही. या दंगलीवेळी पोलिसांची बघ्याची भूमिका राहिली. हिरवी चादर पेटवली गेली नसती तर दंगल झाली नसती ही वस्तुस्थिती आहे, यावर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे.”