महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र विधासभा निवडणुकीत 66.65 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. मात्र, अतिरिक्त 60 लाख मते आली कुठून? याचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. ही अतिरिक्त मते बांगलादेशी घुसखोर होते का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की 9 कोटी 54 लाख यादी फायनल केली. एकूण मतदानात 9 कोटी 70 लाख 25 हजार झाले. 6 कोटी 40 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावल्याची आकडेवारी जाहीर केली, मग 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? बांग्लादेशींना मोदी सरकारने मतदानासाठी आणले का? असा सवालही पटोले यांनी केला. भाजपचे मोठे नेते म्हणतात, मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आले, जर बांगलादेशी आले, तर 11 वर्षांचे केंद्र सरकार कमजोर असल्याचे दिसून येते, असेही पटाले म्हणाले.
राज्यात गेल्या 5 वर्षात 50 लाख आणि 6 महिन्यात 46 लाख मतदार वाढले. निवडणूक आयोगाने वेबसाईटमधून हा डेटा डिलीट केला आहे. आपल्या राज्याची लोकसंख्या नाही त्यापेक्षा जास्त मतदार असल्याचे ते म्हणाले. आम्ही ही आकडेवारी गोळा केली आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहचण्याचे काम सुरू केल्याचे ते म्हणाले. काँग्रेस विचाराने या देशाला उभे केलं असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या लोकांना लोकशाही वाचवायची आहे त्यांनी सोबत यावे. आज त्यांची वेळ आहे, उद्या आमची येईल, असेही पटोले म्हणाले.
भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या 9.70 कोटी आहे तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या 9.54 कोटी असल्याचे जाहीर केले आहे, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? मतदानादिवशी संध्याकाळी जाहीर केलेली 58 टक्के मतदान दुसऱ्या दिवशी 66.5 टक्के कसे वाढले? लाडकी बहिण योजनेचा लाभ बांग्लादेशींनी घेतल्य़ाचे सरकार सांगत आहे तसे विधानसभेला वाढलेले हे मतदार केंद्रातील भाजपा सरकारने बांग्लादेशातून आणले का? असा सवालही पटोले यांनी केला.
मतमोजणीवेळी एक-दोन मतदार वाढले तरी निवडणूक रद्द होते पण विधानसभेला 60 लाख मतदार वाढले पण त्यावर निवडणूक आयोग काहीच उत्तर देत नाही. रात्रीच्या अंधारत 76 लाख मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोगाने अजून दिलेले नाही. पण हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करत त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीसांना ती स्क्रिप्ट नरेंद्र मोदी, अमित शाह, का निवडणूक आयोगाने दिली होती, अशी विचारणा पटोले यांनी केली.
लोकसभा निवडणूक 2019 ते 2024 या पाच वर्षात राज्यात 50 लाख मते वाढली तर लोकसभा निवडणूक 2024 व विधानसभा निवडणूक 2024 या सहा महिन्यात 46 लाख मते वाढली, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार वाढले कसे, याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही, आता तर निवडणूक आयोगावने त्यांच्या वेबसाईटवरून सर्व डेटाच डिलीट केला आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मतदीने दिवसाढवळ्या लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.