
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार नाना शंकरशेट यांचे नाव 31 जुलैपूर्वी मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्या, अन्यथा टर्मिनसमध्ये घुसून आंदोलन करू आणि नामांतराची कमान उभारू, असा इशारा नाना शंकरशेट प्रतिष्ठान, नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समिती आणि तमाम नानाप्रेमींनी केंद्र सरकारला दिला. यावेळी नानाप्रेमींनी नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस असे भव्य स्टिकर टर्मिनसच्या भिंतीवर चिकटवत ठिय्या आंदोलनही केले.
नाना शंकरशेट यांनी पहिली रेल्वे केवळ हिंदुस्थानातच नव्हे, तर आशिया खंडात आणली. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देत राज्य आणि केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करावा यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. 2020 मध्ये तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने राज्याच्या विधिमंडळात हा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला. त्यासाठी महाराष्ट्रातील 15 खासदारांनी यासाठी लेखी शिफारसही केली. मात्र कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी नाना शंकरशेट यांचे खापरपणतू आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्रभाऊ शंकरशेट, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, दैसपचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर, डॉ. विवेक रायकर, रवींद्र माहीमकर, जयप्रकाश बाविस्कर, प्रकाश चिखलीकर, सोनार हितकारिणीचे अध्यक्ष संजय मंडलिक, अनिता दारव्हेकर, अजित पितळे,पद्मिनी शंकरशेट,नानांचे कुटुंबीय यांच्यासह असंख्य नानाप्रेमी उपस्थित होते.