बारामतीमध्ये शरद पवार संस्थापक असलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या मैदानामध्ये ‘नमो महारोजगार मेळावा’ पार पडला. या शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेवर स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि विद्या प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक, खासदार शरद पवार यांचे नाव नव्हते. यावरून चांगलेच राजकारण तापले होते. अर्थात नाव नसले तरी कार्यक्रमाला जाणारच हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. दुसरीकडे शरद पवारांनी गुगली टाकत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाच आमंत्रण दिले होते. यामुळे कोंडीत अडकलेल्या सरकारने वेगाने चक्रे फिरवली आणि बारामती येथील विविध कार्यक्रमांची शरद पवार यांचे नाव असलेली निमंत्रण पत्रिका नव्याने काढून वितरित केली. आज हा कार्यक्रम संपन्न झाला तेव्हा संपूर्ण पवार कुटुंब एकत्र मंचावर आले होते.
कार्यक्रम पत्रिकेत नाव नसले तरी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार असल्याची भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंचावर येताच सुप्रिया सुळे यांनी हात जोडून त्यांचे स्वागत केले. मात्र त्यामागे असणाऱ्या अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याची नजरानजर टाळली आणि जनतेकडे हात दाखवत अभिवादन करायला सुरुवात केली.
त्यामुळे सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळल्या आणि त्यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. मात्र सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनीही एकमेकींशी संवाद टाळला. बारामतीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातच लढत होणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारही काही वेळाने मंचावर आले. त्यावेळी दिलीप वळसे-पाटीलही मंचावर उपस्थित होते. मात्र दोघांनीही एकमेकांची नजरानजर टाळली. सुप्रिया सुळे यांनी मात्र वळसे-पाटलांची भेट घेत त्यांच्याशी हस्तांदोलनही केले.