ओमानविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये बाजी मारल्याने मनोधैर्य उंचावलेल्या नामिबियासमोर आता स्कॉटलंडचे आव्हान उभे ठाकले आहे. गत चॅम्पियन इंग्लंडविरुद्धचा सलामीचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने स्कॉटलंडसाठी हा पहिलाच सामना असेल.
नामिबियाची मदार कर्णधार गेरहार्ड इरासमस व अष्टपैलू डेव्हिड व्हिसी या अनुभवी खेळाडूंवर असेल. या दोघांकडेही मागील दोन टी-20 वर्ल्ड कपचा अनुभव आहे. शिवाय नामिबियाने स्कॉटलंडला मागील तीन लढतींत हरविले आहे. त्यामुळे शुक्रवारच्या लढतीत स्कॉटलंडवरच खऱया अर्थाने दडपण असेल. ब्रिजटाऊनमधील केन्झिंग्टन ओव्हलची खेळपट्टी वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही गोलंदाजांसाठी पोषक आहे. त्यामुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडत नाही, असा इतिहास आहे.
ऑस्ट्रेलियासारख्या संघाला सलामीच्या सामन्यात या मैदानावर ओमानविरुद्ध 164 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली होती, तर ओमानचा संघ 125 धावांतच गारद झाला होता. त्यामुळे नामिबिया-स्कॉटलंडदरम्यानच्या लढतीतही येथे कमीच धावसंख्या होण्याची शक्यता अधिक आहे. या मैदानावर आतापर्यंत 45 टी-20 सामने झाले असून प्रथम फलंदाजी करणारा संघ 29 वेळा, तर प्रथम गोलंदाजी करणारा संघ 13 वेळा जिंकलेला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.