ओरिएंटल कंपनीत मराठी कामगाराची गळचेपी, पगार लटकवला; सुविधा पूर्ववत न केल्यास आत्मदहनाचा इशारा

मुरबाडमधील नामांकित मे. ओरिएंटल कंपनीत मराठी कामगाराची गळचेपी सुरू असल्याचे समोर आले आहे. कंपनी व्यवस्थापनाने मनमानी कारभार करून कामगारांना वाऱ्यावर सोडले जात असून असंख्य कामगारांची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गेली 27 वर्षे प्रामाणिक काम करणाऱ्या सुधाकर यशवंतराव याचा 18 महिने पगार लटकवला असून सुविधा पूर्ववत न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

ओरिएंटल कंपनीत मद्याच्या बाटल्यांचे टोपण बनवले जाते. तेथे 300 हून अधिक कामगार काम करीत असून 150 कामगारांना काही दिवसांपूर्वी नोटिसा न देता काढून टाकण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला. दरम्यान, मुरबाडमधील प्लांट बंद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र काही कारणास्तव प्लांट बंद करण्यात आला नसल्याने कंपनी पुन्हा सुरू झाली. त्यामुळे जुन्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आले. मात्र सवलती बंद करण्यात आल्याने कामगारांनी कंपनी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला, तर काही कामगारांना मोबदला देण्यात आला. मात्र सुधाकर यशवंतराव याला कंपनीकडून पगार देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

या आहेत मागण्या

18 महिने पगार, महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी, रजा, बोनस आणि करार करा अशा मागण्यांचे निवेदन सुधाकर यशवंतराव या कामगाराने कंपनी व्यवस्थापनाकडे दिले आहे.