मंत्रालयात नावाच्या पाटीची अदलाबदल! फडणवीस ‘उप’ ऐवजी झाले मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे ‘मुख्य’ ऐवजी झाले ‘उप’

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी पदभार स्वीकारला तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही पदभार स्वीकारला. या तिघांची कार्यालये सहाव्या मजल्यावरच राहणार आहेत. मात्र नावाच्या पाट्या आता बदलल्या आहेत.

मंत्रालयात सहाव्या मजल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची कार्यालये आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्या कार्यालाबाहेरील मुख्यमंत्री नावाची पाटी काढून त्या जागी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पाटी लागली आहे, तर सहाव्या मजल्यावरच मुख्य सचिवांच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी काढून त्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा पाटी लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालन कायम आणि त्यांच्या नावाची पाटी कायम राहिली आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयात आगमन झाल्यावर महिलांनी त्यांचे औक्षण करीत स्वागत केले.