
रस्त्याने चालता चालता कुठल्याही महिलेला थांबवायचे आणि तुमचे पती अथवा कोणी नातेवाईक माझ्या ओळखीचे असल्याचे उगीचच सांगायचे. मग बोलबच्चनगिरी करून मी एक टक्का व्याजाने कर्ज देतो असे सांगायचे आणि पद्धतशीर बोलण्यात गुंतवून संबंधिताची फसवणूक करणाऱ्या भामटय़ाच्या एलटी मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
बाळू खैरे (40) असे त्या बोलबच्चनगिरी करून महिलांची फसवणूक करणाऱया भामटय़ाचे नाव आहे. वरळी नाका येथून पायी जात असताना बाळूने एका महिलेला रस्त्यात अडविले. तुमचे पती माझ्या ओळखीचे असून मी रेल्वेत कामाला असल्याचे तो महिलेला सांगू लागला. शिताफीने त्याने संवाद वाढविला आणि मी एक टक्का व्याजाने कर्ज देतो असे म्हणाला. तेव्हा माझ्या एका विधवा मैत्रिणीला पैशांची गरज असून तुमचा नंबर तिला देते असे त्या महिलेने बाळूला सांगितले. दरम्यान, त्या महिलेने तिच्या मैत्रिणीला बाळूचा नंबर दिला. त्यानुसार या गुह्यातील तक्रार महिलेने बाळूला फोन करून कर्ज हवे असल्याचे सांगितले. त्यानुसार बाळू त्या महिलेला एलटी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत भेटला. एक टक्का व्याजाने दीड लाख रुपये देतो असे सांगत बाळूने त्या महिलेकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून 15 हजार रुपये घेतले. तसेच तिला बोलण्यात गुंतवून ठेवत तिचा मोबाईल शिताफीने घेऊन तो पसार झाला. याप्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी पाटील, प्रशांत कांबळे व पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला. तेव्हा तो भामटा घाटकोपर परिसरात असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला तेथे जाऊन पकडले. घाटकोपरमध्येच राहणाऱ्या बाळू खैरे याने अशाप्रकारे आणखी किती महिलांची फसवणूक केलीय याचा पोलीस शोध घेत आहेत.