दखल – अध्यात्म व जीवन

>> डॉ. नलिनी हर्षे

‘अध्यात्माच्या शोधात’ हे पुस्तक आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय वातावरणात वावरणाऱ्या सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्यांना जीवनाची रहस्ये जाणून घ्यायची आहेत, जे विज्ञानात रुची घेतात आणि अध्यात्म व जीवन यात मेळ घालून जगू इच्छितात, अशा सर्वांनाच हे पुस्तक सहाय्यक ठरेल. प्रस्तुत पुस्तकाचे लेखक संजीव शाह यांनी इंजिनीअरचा पेशा सोडून अवघ्या 25 व्या वर्षी सामाजिक कार्यासाठी सामील होऊन युवकांसाठी नव्या कार्यशाळा त्यांनी सुरू केल्या. बडोद्याजवळ काही अंतरावर ‘ओअ‍ॅसिस व्हॅली’ नावाची इन्स्टिट्यूट उभारली असून चारित्र्य जडणघडणीसाठी समर्पित अशी ही संस्था आहे. अध्यात्म आणि जीवन या दोन भिन्न गोष्टी आहेत, असे हे पुस्तक मानीत नाही. उलट ठरावीक साचेबंद विचारापासून अध्यात्माला मुक्त करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.

‘अधि आत्मा’ या दोन शब्दांच्या संधीने ‘अध्यात्म’ शब्द बनलेला आहे. ‘आत्मा’च्या दिशेने येणे किंवा वळणे असा त्याचा अर्थ होतो. अध्यात्माला इंग्रजीत ‘स्पिरिच्युअ‍ॅलिटी’ म्हणतात आणि आत्म्याला ‘स्पिरिट’ असे म्हणतात. या विश्वात दोन प्रकारची माणसे आढळतात. भौतिकवादी आणि अध्यात्मवादी. जे भौतिक सुख- सुविधांमध्ये व्यस्त असतात ते भौतिकवादी आणि जे आत्म्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतात ते अध्यात्मवादी मानले जातात. संसारात राहूनही अध्यात्मवादी बनणे अशक्य आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी अध्यात्म म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे.