नालासोपारा येथे शस्त्रसाठा तसेच दहशतवादी कट रचल्याप्रकरणी सहा वर्षांपूर्वी अटक केलेल्या पाच जणांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. 2017 मध्ये पुण्यातील सनबर्ग फेस्टिव्हलमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एटीएसने त्यांना अटक केली होती. हे पाचही जण सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
सुजित रंगास्वामी, अमित बड्डी, गणेश मिस्कीन, श्रीकांत पांगारकर व भरत कुरणे या आरोपींना न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा खटला वेळेत पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याचे खंडपीठाने नमूद केले. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सनबर्न फेस्टिव्हल कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर आठ महिन्यांनी एटीएसने आरोपींना अटक केली होती. जलद खटला हा मूलभूत अधिकार आहे. असे असताना खटल्याला गती न देताच आरोपींना दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे चुकीचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले.