नायर ठरले आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘सर्वोत्तम दंत रुग्णालय’, अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील ‘पिएरी फॉचर्ड अॅकॅडमी’कडून दिला जाणारा अत्यंत मानाचा पुरस्कार मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाला देण्यात आला आहे. ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दंत रुग्णालय’ असा गौरव करत हा पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान, नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनाही आशियाई देशांमध्ये दंत वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वर्ष 2025साठी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

पिएरी फॉचर्ड अॅपॅडमीमार्फत श्रीलंकेतील कोलंबो येथे दंत आरोग्याशी संबंधित विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणारे रुग्णालय म्हणून नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या वतीने नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

z पिएरी फॉचर्ड अॅपॅडमीसारख्या नावाजलेल्या संस्थेमार्फत झालेल्या सन्मानामुळे रुग्णांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची जबाबदारी नायर रुग्णालयावर वाढली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवाव्यात, यासाठी अधिक कटिबद्धपणे कार्य करण्यासाठी निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी व्यक्त केला.