मराठी नही आती, माफी नही मांगुंगा! नाहूर रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी

मध्य रेल्वेच्या नाहूर रेल्वे स्टेशनच्या  तिकीट खिडकीवर एका रेल्वे कर्मचाऱयाने मराठीत बोलून तिकीट मागणाऱया प्रवाशासोबत वाद घालून हिंदीत बोलण्यासाठी नाहक मनस्ताप दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत अमोल माने या प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱयाच्या उद्दामपणाचा व्हिडीओ करून कर्मचाऱयाला मराठी येत नसल्याबद्दल आणि अरेरावीबद्दल माफी मागण्यास सांगितले. तरीदेखील संबंधित रेल्वे कर्मचाऱयाने ‘मुझे मराठी नही आती, माफी नही मांगुंगा’ अशी अरेरावी केली. राज्यात भाजप सरकार येताच भूमिपुत्र मराठी माणसालाच परप्रांतीयांकडून अशी अवहेलना सहन करावी लागत असल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

प्रवासी अमोल माने हे आज दुपारच्या सुमारास नाहूर स्थानकात आपल्या प्रवासासाठी तिकीट काढण्यासाठी आले. यावेळी तिकीट खिडकीवरील कर्मचाऱयाकडे त्यांनी मराठीतून संवाद साधत तिकीट मागितले; मात्र तिकीट खिडकीवरील कर्मचाऱयाने त्यांना उद्धटपणे हिंदीत बोलण्यास सांगितले. यावेळी संतप्त माने यांनी रेल्वे कर्मचाऱयाच्या उद्दामपणाचा व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. आपण मराठी आहोत, तुम्ही मुंबईत नोकरी करण्यासाठी आला आहात. त्यामुळे तुम्हाला मराठी आलीच पाहिजे असे सांगितले. मात्र रेल्वे कर्मचारी आपल्याला मराठी येत नसल्याचे वारंवार सांगत राहिला. रेल्वे कर्मचाऱयाने आपले नाव सांगण्यासही नकार दिला. शिवाय तुम्हाला कोणताही अधिकार नसून कुठेही जा, काय करायचे ते करून घ्या, अशी दादागिरीची भाषाही केली.

कठोर कारवाईची मागणी

मुंबईत राहून मराठी येत नाही असे सांगणारा संबंधित रेल्वे कर्मचारी यावेळी कुत्सितपणे हसतही होता. त्यामुळे या मुजोर रेल्वे कर्मचाऱयावर कारवाई करावी, अशी मागणी माने यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. तर संबंधित उद्दाम रेल्वे कर्मचाऱयावर कठोर कारवाई करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीनेही केली आहे.

 

शिवसेनेच्या दणक्यानंतर मुजोर ताळय़ावर

मराठी प्रवाशावर हिंदी बोलण्यासाठी मुजोरी करणाऱया रेल्वे कर्मचाऱयाच्या उद्दामपणाविरोधात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रेल्वे प्रशासनावर धडक देत कारवाईची जोरदार मागणी केली. यानंतर प्रशासनाने कर्मचाऱयाची कानउघाडणी केल्याचे समजते. यानंतर संबंधित  कर्मचाऱयाने सपशेल शरणागती पत्करत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागतो, अशी गयावया केली. याबाबतचा व्हिडीओच शिवसेनेने आपल्या अधिकृत ‘एक्स’ पेजवर जाहीर केला आहे.

मी सर्वच भाषांचा सन्मान करतो. मला मराठीचाही सन्मान आहे; पण माझी काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो.