वरळी तसेच ना.म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दडपशाहीने राहत्या घरांतून हुसकावणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना आधी रहिवाशांसाठी इमारती उभारल्या जातील आणि नंतर विक्री करण्यासाठी उभारण्यात येणाऱया इमारतींचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन म्हाडाकडून देण्यात आले होते. परंतु त्या आश्वासनालाच म्हाडाने हरताळ फासला आहे. विक्री करण्यासाठी उभारण्यात येणाऱया इमारतींचे काम आधी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विक्री करण्यासाठी उभारण्यात येणाऱया इमारतींच्या जागी असलेल्या चाळींतील रहिवाशांना 15 दिवसांत घरे खाली करण्याच्या नोटिसा म्हाडाने बजावल्या आहेत, असे सुनील शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
रहिवाशी तातडीने घरे रिकामी करावीत यासाठी म्हाडाच्या अधिकाऱयांनी स्थानिक मालमत्ता दलालांना हाताशी धरून भाडय़ाची घरे स्वीकारण्यासाठी रहिवाशांवर दडपण आणले आहे. त्याचप्रमाणे दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे, असे आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.