बीड हत्येप्रकरणी मंत्र्याच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, निर्घृण हत्येचा घटनाक्रम सांगताच सदस्य हेलावले

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम केवळ विरोधी सदस्यच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सांगितला तेव्हा विधानसभा सभागृहातील सर्वच सदस्य अक्षरशः हादरले. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करू नका; कारण सरकारमध्ये बसलेल्यांची चौकशी करण्याची हिंमत कोणीही दाखवणार नाही. संशय असलेल्या मंत्र्यांचा आधी राजीनामा घ्या आणि मग न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी केली.

संतोष देशमुख आणि परभणी येथे झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या नाना पटोले, शिवसेनेचे सुनील प्रभू तसेच सत्ताधारी पक्षाच्या केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सभागृहात मांडला. आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा यांनी संतोष देशमुख यांच्या झालेल्या क्रूर हत्येचा घटनाक्रम सांगितला तेव्हा हत्येचे वर्णन ऐकताना सभागृह अक्षरशः हेलावून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदेसुद्धा सुन्न होऊन चर्चा ऐकत होते.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी हा वाल्मीक कराड असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. जिह्यातील पोलीस अधिकारी आणि कलेक्टरही त्याला हात लावू शकत नाहीत. हा वाल्मीक कराडच त्यांच्या नियुक्ती करतो तर त्याला कोण हात लावणार, असा सवाल आव्हाड यांनी केला. जोपर्यंत एका मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढत नाहीत तोपर्यंत संतोष देशमुखला न्याय मिळणार नाही, असे ते म्हणाले. त्यांना बाजूला केल्याशिवाय चौकशी होऊ शकणार नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्रिमंडळात बदल झालेला दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र असे काही घडले नाही. संशय असलेले मंत्री झाले, असा हल्लाबोल आव्हाड यांनी केला.

सत्ताधाऱ्यांचाही आक्रोश

परळीतील गुंडांनी बीड जिह्याचे गुन्हेगारीकरण केले असून त्याचे क्षेत्र विस्तारत चालले आहे. पूर्वी परळीपुरती असलेली गुंडांच्या साम्राज्याची दहशत गंगाखेडपासून पाटोदा आष्टीपर्यंत आली आहे. त्यांना पोलीसदेखील सामील आहेत. ही गुंडगिरी आणि दहशत मोडून काढण्याची आवश्यकता आहे. या गुंडांचा जो कोणी म्होरक्या आहे त्याला अटक करा तरच बीड जिल्हा शांत होईल, असे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. बीड जिह्यात पोलिसांचा कुठलाही दाखवला नसून या यंत्रणेवर कोणाचा तरी वचक आहे, असा आरोप भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केला. आमदार राजकुमार बडोले यांनीही सूर्यवंशी हत्याकांडाप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱयांवर कारवाईची मागणी केली.