फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा, नागपूर हिंसाचारप्रकरणी चार जणांवर एफआयआर दाखल

औरंगजेबाच्या कबर प्रकरणात हिंसाचार घडवण्यास कारणीभूत ठरलेला आरोपी फहीम खानसह सहा जणांवर भारतीय न्यायसंहिता 152 नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकूण 84 जणांना ताब्यात घेण्यात आले असून चार जणांवर ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज सायबर पोलीसचे डीसीपी लोहित मतानी यांनी दिली.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोन गटांमध्ये झालेल्या राडय़ाचे पर्यवसान दंगलीत झाले. या दंगलखोरांनी वाहने पेटवून देत पोलिसांवरही चाल केली. यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले. अखेर दुसऱ्या दिवशी सायंकाळनंतर या ठिकाणची दंगलसदृश स्थिती नियंत्रणात आली. मात्र दोन्ही गटांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांना खबरदारी घेतली असून संवेदनशील गणेश पेठ, कोतवाली, तहसील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे. तर महाल भागातील शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा आज चौथ्या दिवशीही बंद आहेत. दंगलीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव  या भागातील शाळा-कॉलेजनाही सुट्टी देण्यात आली आहे.

दंगलखोर नागपूरचे नाहीत

नागपूर हिंसाचारात 50 आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली. मात्र अटक केलेले आरोपी हे नागपूरचे नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. तर दंगलखोरांचे बांगलादेश कनेक्शन असल्याचे बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हिंसाचारात बांगलादेश कनेक्शन आहे की नाही, याचा तपास सुरू असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली.

17 ते 19 मार्चच्या पोस्ट ब्लॉक

z दंगल भडकवण्यास कारणीभूत ठरलेल्या सोशल मीडियातील 17 ते 19 मार्च या कालावधीमधील पोस्ट डिलीट करण्यात आल्याची माहितीही मतानी यांनी दिली.

z या कालावधीमधील सर्व मेसेज डिलीट करण्यासाठी एका एजन्सीकडे पाठवण्यात आले आहेत. यानुसार आतापर्यंत 50 टक्के पोस्ट ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

व्हायलन्सपोस्टमुळे दंगल

काही लोकांनी ‘व्हायलन्स’ व्हिडीओ व्हायरल करून दंगल पसरवल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. तर आरोपी फहीम खान याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे व्हिडीओ व्हायरल केल्यामुळेच ही दंगल घडल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.