
नागपूरमध्ये दोन गटांत तेढ निर्माण करून हिंसाचार घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दंगलीत जे नुकसान झाले आहे त्याची दंगेखोरांची मालमत्ता विकून भरपाई केली जाईल. या घटनेस सोशल मीडियावरून ज्यांनी चिथावणी दिली त्यांना सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. जिथे बुलडोझर चालवायची गरज असेल तिकडे तो चालवला जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये दाखल होत 17 मार्चला नागपुरात उफाळलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा पोलिसांकडून आढावा घेतला. नागपूरचे पोलीस आयुक्त, एसपी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याची मानसिकता पोलिसांची आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ज्या लोकांचे नुकसान झाले, काहींच्या गाडय़ा फुटल्या, काहींच्या अंशतः फुटल्या, त्या सर्वांना येत्या 3-4 दिवसांत नुकसानभरपाई दिली जाईल. आता जे काही नुकसान झाले आहे, ते सर्व नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाईल. दंगलीत झालेल्या नुकसानाची सगळी किंमत काढली जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाही तर त्यांची मालमत्ता विकून नुकसानभरपाईची रक्कम वसूल केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर दंगल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 104 जणांमध्ये 12 मुलांचा समावेश असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या मुलांच्या पालकांवर कारवाई केली जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी या सगळय़ाचा तपास अजून सुरू आहे, पण विधिसंघर्षित बालकांवर जितके कठोर कायदे आहेत, त्याच्या कक्षेत राहून कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. या दंगलीत दगडफेक करणाऱ्यांमध्ये काही लहान मुलांचादेखील समावेश असून त्यांचे पालकही चौकशीच्या कचाटय़ात अडकण्याची शक्यता आहे.
भडकवणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई
विशेषतः सोशल मीडियाचे मोठय़ा प्रमाणात ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा तिचा प्रसार व्हावा म्हणून पोस्ट केल्या, त्या सर्वांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी केले जाणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दंगल भडकवण्यासाठी मदत केली. जवळपास 68 पोस्टची आतापर्यंत ओळख पटवून डिलीट करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेणे चालू आहे. भडकवणारे पॉडकास्ट, चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केलेल्या लोकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
संचारबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल
नागपूरमध्ये सध्या ज्या भागांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत, त्या भागातील संचारबंदी आजपासून टप्प्याटप्प्याने उठवण्यात येईल. नागपूरमध्ये आता शांतता असल्याचे फडणवीस म्हणाले.
गरज असेल तिथे बुलडोझर चालवणार
नागपूर हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात ज्या प्रकारे बुलडोझर कारवाई केली जाते, तशी करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करतो. जिथे बुलडोझर चालवायची गरज असेल तिकडे तो चालवला जाईल. जिथे चुकीचे काम होईल ते चिरडून टाकले जाईल. कोणालाही सोडणार नाही.
104 दंगेखोरांची ओळख पटली
सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलवरील चित्रीकरण, पत्रकारांनी केलेल्या चित्रिकरणात जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. 104 लोकांना ओळखण्यात आले असून 92 लोकांना अटक केली असून काही लहान बालकांवरही कारवाई सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात बदल नाही
नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता, तो शहराच्या एका भागात झाला होता. त्याचा बाकी नागपूरवर काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 मार्चच्या नियोजित नागपूर दौऱ्यात कोणताही बदल होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हिंसाचारातील जखमी इरफानचा मृत्यू
हिंसाचाराच्या घटनेत दगडफेकीत जखमी झालेल्या इरफान अन्सारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या अन्सारी याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते.