दंगेखोरांनी महिला पोलिसाच्या वर्दीवर हात टाकला, विवस्त्र करण्याचा प्रयत्न; नागपूर हिंसाचाराची धक्कादायक माहिती आली समोर

औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेले नागपूर अजूनही धुमसत असताना आता हिंसाचारामध्ये समाजकंटकांनी चक्क महिला पोलिसाच्या वर्दीला हात घालत वर्दी फाडत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमावाने महिला पोलिसाला घेरून अश्लिल शेरेबाजी करीत विनयभंगही केला. यावेळी पोलीस महिलेने धाडस दाखवत आपली सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.  ही घटना समोर येताच प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी रात्री दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर तिसऱ्या दिवशीही नागपूर धुमसत असून तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे संवेदनशील ठिकाणी संचारबंदी कायम ठेवण्यात आली असून शाळा-बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हिंसाचार सुरू झालेल्या महाल परिसरासह मोमीनपुरा आणि शहरातील अतिसंवेदनशील 11 आणि संवेदनशील 19 ठिकाणी पोलिसांची पथके तैनात ठेवण्यात आली असून दंगलखोरांची धरपकड सुरू आहे. दंगलीनंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच दंगलखोरांनी महिला पोलिसाला घेरून तिचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी जमावाने पोलिसांच्या अंगावर चालून जात तुफान दगडफेक केली. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत.

आरोपी फहीम खानने माथी भडकवली

नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारास 38 वर्षीय फहीम खान नावाची व्यक्ती जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यानेच लोकांची माथी भडकवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी फहीम खानचा उल्लेख दंगलीचा मास्टरमाइंड असा केला आहे. त्यामुळे तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट होत आहे.

46 जणांच्या मुसक्या आवळल्या

z या हिंसाचारात उपायुक्त दर्जाच्या 4 अधिकाऱ्यांसह 33 पोलीस जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी केलेल्या धरपकडीमध्ये 46 आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

z  नागपूरमध्ये हिंसाचार थांबला असला तरी तणावपूर्ण स्थिती असल्यामुळे 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. तर नागपूर शहरातील झोन-3,4 आणि 5 या 11 ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी आहे.

घटनेच्या दिवशी औरंगजेब झिदाबादचे नारे

नागपूरमध्ये हिंसाचार घडल्याच्या दिवशीच ‘औरंगजेब झिंदाबाद’चे नारे दिल्याचेही आता समोर आले आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोरच हा प्रकार घडला असून याबाबतचा एक व्हिडीओही प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून व्हायरल व्हिडीओची तपासणी करण्यात येत असून पोलीस ठाण्याबाहेर आलेला जमाव तोच होता का, याचा तपास केला जात आहे.

म्हणूनच उसळली दंगल

औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी करीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी सायंकाळच्या सुमारास  महाल गांधी गेट परिसरात घोषणाबाजी करीत औरंगजेबाचे छायाचित्र आणि त्याच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन करण्यात आले. यावर मुस्लिमांनी आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी केली. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही गट एकमेकांशी भिडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने पोलिसांच्या गाडय़ांसह अनेक वाहने जाळली. विशेष म्हणजे दंगल आटोक्यात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दंगलखोरांनी प्रचंड दगडफेक केली. त्यामुळे या ठिकाणी तणाव वाढला.