महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका एका दिवसापूर्वी 40 लाख रुपयांत उपलब्ध करून दिली जाईल, या आशयाचे भ्रमणध्वनी काही उमेदवारांना आल्याची धक्कादायक ध्वनिफित समोर आली होती. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी भंडारा जिह्यातून दोन आरोपींना अटक केली आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी ‘एमपीएससी’वर विश्वास ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, परंतु परीक्षेच्या आधीच ‘नमस्कार, मी रोहन कन्सल्टन्सी नागपूरमधून बोलत आहे,’ असे फोन काही उमेदवारांना करून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले जात होते. काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या सूचनेनुसार नागपूर पोलिसांनी याचा तपास सुरू करून दोन आरोपींना अटक केली आहे.
मुख्य आरोपी दोघे भाऊ फरार
एमपीएससी प्रश्नपत्रिका प्रकरणात पोलिसांनी दीपक साखरे आणि योगेश वाघमारे या दोघांना ताब्यात घेतले आहे, तर मुख्य आरोपी आशीष कुलपे व प्रदीप कुलपे हे दोघे भाऊ फरार आहेत.
रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर एमपीएससीकडून तत्काळ फिर्याद देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तर एकाला नागपूरहून ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात पेपर लिक झाल्याचे कुठेही दिसत नाही. आरोपींची चौकशी केल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. यामध्ये आणखी कोणी आहे का? तसेच परीक्षेपूर्वी गोंधळ निर्माण करण्याचा कोणाचा हेतू होता का, हेही तपासले जाईल. – निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा