वाघिणीच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक

विदर्भातील जंगल परिसरात गेल्या दहा दिवसांत दोन वाघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.  तुमसर वन परिक्षेत्रात एका वाघिणीला करंट देऊन ठार केले. तिचे तुकडे करून फेकण्यात आले. या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

आठ दिवसांपूर्वी तुमसर येथे एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर भंडाऱ्यात एका वाघिणीचे दोन तुकडे करून जंगलात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या दोन घटनांमुळे वन विभागाची अक्षरशः झोप उडाली होती. वाघाचे तुकडे करून फेकल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाल्याने वन परिक्षेत्र अधिकारी आणि पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करून तुमसरच्या नवेगाव येथील राजेंद्र पुंजाम, दुर्गेश लसुते आणि राजू वरकडे या तिघा आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींना वनकोठडी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तुमसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.