उमरेड कऱहांडला अभयारण्यामध्ये गेलेल्या पर्यटकांच्या वाहनांनी वाघीण आणि तिच्या पाच बछडय़ांना रस्त्यातच काही काळ घेरून ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर जिप्सीचे चार चालक आणि चार पर्यटक मार्गदर्शक यांना प्रशासनाने सात दिवसांसाठी निलंबित केले आहे. शिवाय जिप्सीचालकांना प्रत्येकी अडीच हजार तर गार्डना 450 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
उमरेड-पवनी-कऱहांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ‘एफ-2’ वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. उमरेड कऱहांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ते पर्यटकांना भुरळ घालत आहेत. त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी जंगल सफारीवर असलेल्या पर्यटकांच्या जिप्सीने समोरून व मागून घेरले होते. याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर वन प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी या जिप्सीचालकांनी व पर्यटक मार्गदर्शकांनी गोठणगाव तलावाजवळ वाघीण व तिच्या पाच बछडय़ांसह जात असताना रस्त्यावर बराच वेळ घेरून ठेवले होते. या प्रकारानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक व उमरेड-पवनी-कऱहांडला अभयारण्याचे प्रभारी डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी वन परिक्षेत्र अधिकारी आरती उईके यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अभयारण्य प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
असा आहे नियम
पर्यटकांची वाहने वाघापासून 30 मीटर दूर असणे असा नियम आहे. पेंच, ताडोबा व अन्य व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यात येणाऱया पर्यटकांच्या वाहनांची गती, वाहने कुठे थांबतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मॅप बनविण्यात आले आहे. जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर गुन्हा नोंदविला जातो. जंगलांमध्ये वाघाजवळून कुठलेही वाहन 30 मीटर दूर असले पाहिजे.