अंघोळीसाठी पेंच कालव्यात उतरलेले चार विद्यार्थी वाहून गेल्याची घटना नागरपूरमधील रामटेक येथे घडली आहे. मनदीप अविनाश पाटील, अनंत योगेश सांबरे, मयंक कुणाल मेश्राम आणि मयुर खुशाल बांगरे अशी वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सर्वजण सातवी ते अकरावीचे विद्यार्थी आहेत. चौघांची शोध मोहिम सुरू आहे.
सर्व विद्यार्थी तुमसर रोडवरील रामटेकजवळ असलेल्या इंदिरा गांधी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होते. सर्व जण बोरीच्या घोटी चौकी येथील इंदिरा गांधी वसतिगृहात राहत होते.
सुट्टी निमित्ताने वसतिगृहातील आठ विद्यार्थी पेंच कालव्यात अंघोळीसाठी गेले होते. यापैकी पाच विद्यार्थ्यांनी कालव्यात उडी घेतली तर अन्य तिघे काठावर होते. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाचही जण वाहू लागले. यापैकी एकाला वाचवण्यास यश आले. तर अन्य चौघे वाहून गेले.
कालव्याच्या काठावर उभ्या असलेल्या तिघांनी आरडाओरडा करताच नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. मात्र चौघांना वाचवण्यास अपयश आले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोताखोरांच्या मदतीने कालव्यात शोधमोहिम सुरू केली आहे. अद्याप चौघांचा शोध लागला नाही.