विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका असल्याने विदर्भातील काँग्रेसच्या आठ पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. निवडणूक रद्द करून नव्याने घेण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. अॅड. आकाश मुन व अॅड. पवन डहाट हे याचिकाकर्त्यांचे वकील आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, दक्षिण नागपूरचे गिरीश पांडव, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, शेखर शेंडे, संतोषसिंग रावत, सतीश वारजूरकर यांनी ही याचिका सादर केली आहे.
निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागते, मात्र ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते. याची कारणेही स्पष्ट करावी लागतात. तेसुद्धा केले नाही. एवढेच नव्हे तर ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा निवडणूक आयोगाने काढले नसल्याचे याचिकाकर्ते गुडधे यांनी सांगितले.