नागपुरात अ‍ॅल्युमिनियम कंपनीत स्फोट, 5 जणांचा मृत्यू

नागपूर येथील उमरेड एमआयडीसी परिसरातील एका अ‍ॅल्युमिनियम कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, नागपूर येथील उमरेड एमआयडीसी परिसरातील एका अ‍ॅल्युमिनियम कंपनीत स्फोट होऊन अचानक आग लागली. या आगीत 9 जण होरपळले. त्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातच उपचारादरम्यान आणखी 2 जणांचा मृत्यू झाला. 4 जखमींची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला. कंपनीत अचानक स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.