भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे मित्रांसह ऑडी हिट अॅण्ड रन प्रकरणापूर्वी ज्या ला होरी बारमध्ये बसले होते तेथील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहेत. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पोलिसांवर हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणल्याच्या आरोपाला पुष्टी मिळत आहे. देवाभाऊ, पुछ तो गडबड है, अशी चर्चाही नागपुरात रंगली आहे.
9 ऑगस्ट रोजी भरधाव ऑडी चालवून संकेत आणि त्याच्या मित्रांनी पाच वाहनांना उडवले होते. त्यात दोन तरुण जखमी झाले होते. तत्पूर्वी संकेत आणि त्याचे मित्र ला होरी बारमध्ये जेवणासाठी गेले होते. तिथे त्यांनी 12 हजार रुपयांची दारू रिचवली आणि चिकन-मटणावरही ताव मारला होता. पोलिसांच्या हाती ते बिल लागले आहे, परंतु त्यावर नमूद वेळेदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मात्र आश्चर्यकारकरीत्या गायब आहे. ते जाणीवपूर्वक गायब करण्यात आले असावे असा दाट संशय व्यक्त होत आहे.
सीताबर्डी पोलिसांनी ला होरी बारमधील डिजिटल व्हिडीओ रेका@र्डर (डीव्हीआर) ताब्यात घेतला आहे. बार मालकाने सुरुवातीला सीसीटीव्ही देण्यास नकार दिला होता. कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिल्यानंतर त्याने डीव्हीआर ताब्यात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या ‘ला होरी’त संकेतचाही अड्डा
ऑडी हिट अॅण्ड रन प्रकरणामुळे ला होरी बार चर्चेत आला आहे. गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जाणारा हा बार पहाटेपर्यंत राजरोसपणे सुरू असतो. संकेत बावनकुळेनेही तो आपला अड्डा बनवला होता. तिथे त्याचे नियमितपणे येणे-जाणे होते असे सांगितले जाते. त्यामुळे आपला मुलगा काय करतो हे चंद्रशेखर बावनकुळेंना माहीत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच हा बार आहे. कुख्यात गुन्हेगार आणि धनदांडग्यांच्या पुत्रांचा तो अड्डाच बनला आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये पुख्यात शेखू खान आणि सुमित चिंतलवार टोळीमध्ये याच ला होरी बारमध्ये टोळीयुद्ध झाले होते. सुमितच्या माया गँगचा गुंड रोशन याच्या प्रेयसीची शेखूच्या टोळीतील गुंडाने छेड काढली होती. त्यावरून दोन्ही टोळय़ांमध्ये गोळीबार झाला होता. जुलै 2016 मध्ये गुंड राजा परतेकीच्या टोळीने सचिन सोमपुवर याची गोळय़ा घालून हत्या केली होती. त्या हत्येचा कट याच ला होरी बारमध्ये शिजला होता.