Nagpur Hit And Run : पुण्यानंतर आता नागपूर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात, आरोपींचे ब्लड सँपल नष्ट करण्याचा प्रयत्न!

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण गाजत असताना नागपूरमध्येही अशाच प्रकारे हिट अँड रनची घटना घडली. पुण्यातील घटनेत पोलिसांकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा मोठा आरोप झाला होता. आता नागपूरमधील प्रकरणातही पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावला आहे. नागपूरमध्ये रविवारी रात्री भरधाव कारने अनेकांना चिरडले. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी आहेत. अपघाताच्या घटनेला 48 तास उलटून गेले तरीही पोलिसांनी अद्याप आरोपींचे ब्लड सँपल तपासणीसाठी पाठवलेले नाहीत. यामुळे पुण्याप्रमाणे नागपूर पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. नागपूरमधील या हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याचे पाच मित्र असे एकूण सहाजण आरोपी आहेत.

फडणवीसांच्या नागपुरात पुन्हा हिट अँड रन; फुटपाथवर झोपलेल्या चिमुरडय़ासह आठ जणांना भरधाव कारने चिरडले

रविवारी घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर सर्व सहा आरोपींचे ब्लड सँपल्स पोलिसांच्या हाती लगेचच देण्यात आले होते, अशी माहिती सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ. राज गजभिये यांनी दिली. आरोपींचे ब्लड सँपल Regional Forensic Science Laboratory कडे तपासणीसाठी का पाठवले नाही, हे फक्त पोलीसच सांगू शकतील, असे डॉ. गजभीये म्हणाले. गजभीये यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचे ब्लड सँपल हे गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोपींचे ब्लड सँपल्स आवश्यक त्या तापमानात ठेवले नाहीत तर ते खराब होऊन निरूपयोगी ठरतील, असे सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारचा निष्काळजीपणा हा आरोपींना कठोर शिक्षा होण्यापासून वाचवू शकतो, असेही सूत्रांनी म्हटले. ब्लड सँपल तपासणीत होणाऱ्या दिरंगाईने वाठोडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हा एक प्रकारे पुरवा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.