नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले, इंजिनीअरिंग जमत नसेल तर शेती कर म्हणणाऱ्या आईवडिलांना मुलाने संपवले

नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवदर्शन, आध्यात्मिक, तीर्थस्थानी जाऊन वर्षाची चांगली सुरुवात केली जाते. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा मुलगा गेली दोन वर्षे नापास होत होता. त्यामुळे इंजिनीअरिंग जमत नसेल तर शेती कर, आयटीआय किंवा पॉलिटेक्निक कर, असा सल्ला देणाऱ्या आईवडिलांना मुलाने अत्यंत थंड डोक्याने संपवले. आईचा गळा दाबून तर वडिलांच्या मानेवर वार करून त्यांची हत्या केली. लीलाधर आणि अरुणा डाखोळे असे दुर्दैवी आईवडिलांचे नाव आहे. दरम्यान, हत्या करून फरार झालेला मुलगा उत्कर्ष याला कपीलनगर पोलिसांना अटक केली आहे.

लीलाधर हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीवर होते तर पत्नी अरुणा या संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांना उत्कर्ष आणि सेजल अशी दोन मुले आहेत. उत्कर्ष हा इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो तर मुलगी बीएएमएसच्या प्रथम वर्षाला शिकते. उत्कर्ष हा गेल्या दोन वर्षांपासून नापास होत होता. त्यामुळे शिक्षिका असलेल्या आई त्याला बैलवाडय़ाला असलेली त्यांची शेती कसण्यास सांगत होती तर वडील इंजिनीअरिंग झेपत नसेल तर आयटीआय किंवा पॉलिटेक्निकला प्रवेश घे, असा सांगत होते.

वडिलांनी केली मारहाण, आईने बॅग भरली

घरात वारंवार त्याला शिक्षण सोडून देऊन शेती करण्यासाठी टोमणे मारण्यात येत होते. याच कारणांनी वडिलांनी 25 डिसेंबरला उत्कर्षला मारहाण केली आणि शिक्षण सोडून शेती करण्यास सांगितले. आईने त्याची बॅग भरून ठेवली होती. त्यामुळे उत्कर्ष अस्वस्थ झाला होता. त्याने दुसऱया दिवशी 26 डिसेंबरला पहिल्यांदा घरात काम करत असलेल्या आईचा गळा दाबून खून केला. तासाभराने बाहेर गेलेले वडील घरी आल्यानंतर वडिलांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांचीही हत्या केली. हत्याकांडानंतर अत्यंत थंड डोक्याने दोघांचेही मृतदेह घरात तसेच ठेवले, घराला कुलूप लावले आणि तो पळून गेला.