
जुना गोधनी नाका चौक रोडवरील मानकापूर आठवडी बाजारात पाच युवकांच्या टोळक्याने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. या घटनेने बाजारात चांगलाच गोंधळ उडाला. नागरिकांनी पळापळ सुरू केली. गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
रात्री 11 वाजताच्या सुमारास मानकापूर आठवडी बाजारात पाचजणांचे टोळके आले. यातील एकाने शाहरुख कहा है? अशी विचारणा दुकानदाराला केली. यानंतर काही कळायच्या आतच अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार युवकांना ताब्यात घेतले.
आरोपी युवकांनी बाजारात अनेकांना शिवीगाळ केली. काही दुकानदारांना मारहाण केली. त्यांच्या हातात शस्त्रs होती. काही वेळातच त्यांनी एका व्यक्तीवर गोळी झाडली ती छातीत शिरल्याने त्याचा मृत्यू झाला. सोहेल खान (35)असे गोळी लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कारमधून आले आणि अचानक गोळीबार सुरू केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव डोंगरे आणि दुसऱयाचे नाव मसराम असल्याचे सांगण्यात येत आहे.