नागपुरात दोन गटात राडा; तुफान दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात हिंसा उसळली. दोन गटात राडा असून तुफान दगडफेक करण्यात आली. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. नागपुरातील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी तिथीनुसार जयंती होती. त्यामुळे नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी शिवाजी चौकात दोन गट वाद झाला. महल परिसर, चित्रा टॉकीज परिसरात दुसऱ्या गटाची लोक बाहेरुन आली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.