नागपुरात दोन बंडखोरांची काँग्रेसमधून हकालपट्टी, मुळक आणि जिचकार 6 वर्षांसाठी निलंबित

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा कार्यकर्त्यांवर पक्षाकडून कडक कारवाई केली जात आहे. रामटेक आणि काटोल या दोन ठिकाणी काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक आणि याज्ञवल्क्य जिचकार यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनाही पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप करताना रामटेकची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वाटय़ाला आली. तर काटोलची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली. रामटेकमधून राजेंद्र मुळक यांनी तर काटोल मतदारसंघातून याज्ञवल्क्य जिचकार यांनी उमेदवारी अर्ज भरला. या दोघांनीही उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी करण्यात आली. परंतु, या दोघांनीही बंडखोरी कायम ठेवली. त्यामुळे गुरुवारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे.