
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील गौडबंगाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार मोहन मते, आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, आमदार देवराव भोंगळे व अजित पवार गटाचे नेते मनोज कायंदे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या सर्वांना समन्स धाडून उत्तर मागवले आहे.
येथील 26 पराभूत उमेदवारांनी विजयी आमदारांच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आले आहे. त्यातील वरील सर्वांची सुनावणी विविध न्यायमूर्तींसमोर पार पडली. त्याची दखल घेत न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आमदारांना समन्स बजावले आहे. फडणवीस यांना 8 मे 2025 पर्यंत याचे उत्तर द्यायचे आहे. अन्य तीन आमदारांना तीन आठवडय़ांत प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
व्हीव्हीपॅटची मोजणी केली नाही
बल्लारपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंग रावत यांनी मुनगंटीवार यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. तसेच सिंधखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गटाच्या मनोज कायंदे यांच्या आमदारकीविरोधात याचिका केली आहे. राजुराचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी आमदार भोंगळे यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. दक्षिण नागपूरमधून जिंकलेले भाजपचे मोहन मते यांच्याविरुद्ध गिरीश पांडव तर चंद्रपूर जिह्यातील चिमूरमधून जिंकलेले भांगडिया यांच्याविरुद्ध काँग्रेस उमेदवार सतीश वारजूरकर यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.
फडणवीसांची आमदारकी अवैध जाहीर करा
फडणवीस यांच्या आमदाराकीला काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या निवडणुकीत अनेक नियमांचे पालन झाले नाही. भ्रष्ट मार्गाचा वापर झाला. त्यामुळे फडणवीसांची आमदारकी अवैध असल्याचे जाहीर करा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने फडणवीस यांना उत्तर दाखल करण्यासाठी समन्स बजावले आहे, अशी माहिती गुडधे यांचे वकील पवन दहट यांनी दिली.
काय आहे आरोप
ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्याआधी निवडणूक आयोगाने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्याची अधिसूचना जारी केली नाही. पराभूत उमेदवारांना मतदान केंद्र व मतमोजणीचे सीसीटीव्ही फुटेज व फॉर्म क्रमांक 17 दिले जात नाही. व्हीव्हीपॅटची मोजणी केली जात नाही, असा आरोप या याचिकांतून करण्यात आला आहे. न्यायालयाने आयोग व अन्य प्रतिवादींची नावे वगळून केवळ विजयी उमदेवारांना नोटीस बजावल्याची माहिती अॅड. पवन डहाट व अॅड. आकाश मनू यांनी दिली.