उमेदवारी अर्ज भरायला झाला अवघ्या एक मिनिटाचा उशीर आणि माजी आमदाराचे निवडणूकीचे स्वप्न भंगले

नागपूरचे माजी आमदार अनिस अहमद यांना उमेदवारी अर्ज भरायला जाण्यासाठी अवघ्या एक मिनिटाचा उशीर झाला. ते पोहचे पर्यंत निवडणूक कार्यालयाचे दरवाजे बंद झाले होते त्यामुळे त्यांना अर्जच भरता आला नाही. त्यामुळे तीन वेळा आमदार राहिलेल्या अनिस अहमद यांचे चौथ्यांदा निवडणूक लढण्याचे स्वप्न भंगले.

अनिस अहमदज हे नागपूर मध्य मतदारसंघातून तीन वेळा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र यंदा अनिस अहमद यांनी काँग्रेसचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी मध्य नागपूरमधून निवडणूक लढण्यासाठी एबी फॉर्म देखील दिला.

अनिस अहमद यांना सोमवारी एबी फ़ॉर्म मिळूनही त्यांनी मंगळवारी अर्ज दाखल करायचा ठरवले. अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांनी रॅलीही काढली. मात्र रॅलीमध्ये बराच वेळ गेल्याने ते अर्ज भरायला उशीरा पोहोचले. तीन वाजून एक मिनिटांनी ते कार्यालयात पोहोचले मात्र तो पर्यंत अर्ज स्वीकारायची वेळ निघून गेली होती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारला नाही. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत अनिस अहमद हे निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होते मात्र त्यांनी अहमद यांचा अर्ज स्वीकारला नाही.