नागपूर विमानतळ दररोज आठ तास बंद राहणार, चार महिने चालणार देखभाल-दुरुस्तीचे काम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे (रिकार्पेटिंग) काम करण्यात येणार असून त्यासाठी विमानतळ दररोज आठ तास बंद ठेवण्यात येणार आहे. दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाणार असून ते पुढील चार महिने सुरू राहणार आहे, अशी माहिती नागपूर विमानतळावरील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

कोणत्याही विमानतळावरील उड्डाण सेवा सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी धावपट्टी उत्तम स्थितीत असणे आवश्यक असते. त्यासाठी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित विमानतळ व्यवस्थापन धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करत असतात.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र निवडणुकीदरम्यान अतिविशेष व्यक्तींच्या भेटींमुळे हे काम पुन्हा थांबवण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा हे काम सुरू करण्यात आले आहे.

31 मार्चपर्यंत काम पूर्ण करणार

विमानतळावरील देखभाल-दुरुस्तीचे काम पावसाळ्यात थांबवण्यात आले होते. पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरपासून पुन्हा हे काम सुरू करण्यात आले, पण एका महिन्याने विधानसभा निवडणूक लागली. त्यामुळे सुरू करण्यात आलेले हे काम थांबवण्यात आले. मात्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर 24 नोव्हेंबरपासून पुन्हा काम सुरू करण्यात आले. दरम्यान 31 मार्च 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दिले आहे.