>> योगेश जोशी
श्रावण महिना हा भोलेनाथ शंकराच्या उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो. महादेल नीळकंठ असून त्यांच्या कंठासोबत लक्ष वेधून घेतो ते म्हणजे त्यांच्या गळ्यात रुळणारा सर्प…आपल्या संस्कृतीत अनेक प्रतीके आहेत. या प्रतीकांपैकी एक म्हणजे नागपंचमीचा सण…महादेवाच्या गळ्यात नाग रुळत असतो. तर श्रीमहाविष्णू शेषनागावर विराजमान असतात. आपल्या गावस संस्कृतीसाठी निर्सगातील उपयुक्त जीव आणि वस्तूंना देवतेचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या सणाचे महत्त्व आणि त्यातील प्रतीके जाणून घेऊ.
आपली कृषीप्रधान संसकृती आहे. या संस्कृतीचा कणा, आधारस्तंभ म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना सर्प अनेक प्रकारे उपयुक्त ठरतात. त्यामुळे सर्प किंवा नाग यांना शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. शेतात त्यांची बिळे असल्याने त्यांच्यामुळे जमीन भुसभुशीत होते. तसेच शेताची आणि अन्नधान्याची नासाडी करण्याऱ्या उंदीर हे सापांचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे शेतकरी नागपंचमीचा सण साजरा करून या आपल्या मित्रांबाबत कृतज्ञता व्यक्त करतात. स्वातंत्र्यापुर्वी आपल्या देशाची गारुड्यांचा देश अशी ओळख होती. गारुडी आले की सर्प आलेच…म्हणजे सापांना आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून महत्त्व आहे.
श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्ये असतात. श्रावणी सोमवार, मंगळागौर या व्रतांप्रमाणे श्रावण शुद्ध पंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. त्यामुळे या पंचमीला नगपंचमी म्हणतात. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले. तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो, अशीही मान्यता आहे. नागपंचमीला अनंत म्हणजेच शेषनाग, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 प्रमुख नागांची पूजा केली जाते. या सर्व नागांना अनेक पौराणिक कथांमध्य महत्त्वाचे स्थान आहे.
या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग बनवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याच्याकडे शेतीच्या रक्षणाची आणि मंगल करण्याची प्रार्थना केली जाते. अनेक जणांचा पत्रिकेत कालसर्प नावाचा योग असतो. नागपंचमीला नागाची मनोभावे पूजा केल्यास या योगाचे दुष्परिणाम कमी होतात, अशी मान्यता आहे. पुर्वीच्या काळी सर्पदंश किंवा विंचूदशांची भीती असायची. आपले कुटुंब या भयापासून मुक्त असावे, यासाठीही नागपूजा करण्याची प्रथा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.
या दिवशी नागाची पूजा करावी. तसेच या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये. कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये. शक्यतो उकडून केले जाणारे पदार्थ करावेत, अशी मान्यता आहे. पूर्वीच्या काळी महिलांना कामातून फुरसत मिळत नसे. त्यामुळे त्यांना एखादा दिवस तरी रांधा, वाढा या कामातून थोडा दिलासा मिळण्यासाठी फक्त उकडेले पदार्थ करण्याची पद्धत रुळली असवी, अशी मान्यता आहे.
पुर्वी नागपंचमीपूर्वी जंगलातून साप किंवा नाग पकडून आणले जात. त्यांना दोनतीन दिवस उपाशी ठेवत. त्यानंतर या सणाच्या दिवशी नागांना घरोघरो फिरवून त्यांना दूध देण्यात येत असे. मात्र, दूध हे सापासाठी विषारी ठरते. त्यापासून अनेक प्रयत्नानंतर ही प्रथा बंद झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील बत्तीस शिराळा येथील नागपंचमीचा उत्सव देशभरात पोहचला आहे. मात्र, या सणामागचे खरे कारण समजून घेत उत्सव साजरा केल्यास प्रत्येक सणाचा आनंद द्विगुणीत होईल.