ठसा – डॉ. नागनाथ बिराजदार

मराठवाड्यातील सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीशी डॉ. नागनाथ वैजनाथराव बिराजदार यांचे नाव जोडले होते. एक तर त्यांनी मराठवाड्यातील निजामशाही राजवटीचे चटके सोसलेच होते. दुसरे म्हणजे, शिक्षण आणि संघर्ष याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सुरुवातीपासून जाणले होते व त्याच दिशेने त्यांनी आपले कार्य पुढे नेले. निजामकाळात प्राथमिक शिक्षण झाल्याने उर्दू भाषेवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व होते; पण मराठी, इंग्रजीवरही त्यांची तितकीच पकड होती. त्यांचा पिंड शिक्षकाचा आणि संशोधकाचा होता. त्यांनी त्यासाठी वनस्पतीशास्त्राची निवड केली व त्याच क्षेत्रातले तज्ञ प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. विषय सोपा करून सांगणे ही त्यांची हातोटी होती. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ते ओळखले जात.
डॉ. नागनाथ वैजनाथराव बिराजदार हे तसे मूळचे मराठवाडय़ातील. उदगीर तालुक्यातील नागलगाव या त्यांच्या गावी त्यांनी शालेय शिक्षण घेतले; मात्र उच्च शिक्षणाच्या ओढीने त्यांनी मराठवाड्याबाहेर पाऊल टाकले आणि उस्मानिया विद्यापीठ तसेच पुणे विद्यापीठाशी नातं जोडलं. अतिशय कष्टप्रद आणि खडतर परिस्थितीवर मात करत चार पायली बार्ंडग योजनेतील वसतिगृहात ते राहिले. चिकाटीने वनस्पतीशास्त्र या विषयातील ‘डॉक्टरेट’ पदवी प्राप्त केली. पुणे विद्यापीठात सहसंशोधक या पदावर व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. अंगभूत गुणवत्ता आणि महत्त्वाकांक्षा या गुणांच्या जोरावर वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असतो. ही जाणीव डॉ. बिराजदार यांच्या मनात कायम होती. आपल्या ज्ञानाचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना तर त्यांनी करून दिलाच, त्यांच्या अनेक विदय़ार्थ्यांना डॉक्टरेटही मिळाली. पुणे विद्यापीठातील अभ्यासमंडळ सदस्य, शास्त्रशाखा सदस्य व विविध भारतीय शास्त्रशाखा कार्यकारिणीचे सदस्य ही मानाची पदे त्यांनी भूषविली. दिल्ली, चंदीगड, लखनौ, बर्लिन, सिडने, लंडन, टोकियो अशा अनेक ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी सादर केलेल्या संशोधनात्मक निबंधांची विशेष दखल घेण्यात आली. त्यांचे वनस्पतीशास्त्र व त्यासंबंधित असलेल्या विषयांबाबतचे ज्ञान तरुण पिढीला कायमस्वरूपी प्रेरणादायी राहील. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला मराठवाडा मित्र मंडळ या संस्थेच्या कामात वाहून घेतले. या संस्थेतील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. ही संस्था स्थापन करण्यापासून ते नावारूपाला आणण्यापर्यंत त्यांनी बहुमोल योगदान या संस्थेला दिले. ‘सहसचिव’ हे पद त्यांनी सांभाळले आणि पुढे ते संस्थेचे उपाध्यक्ष झाले. पुण्यात स्थायिक होऊनसुद्धा त्यांनी आपल्या जन्मगावाशी, तिथल्या मातीशी, माणसांशी आपले स्नेहबंध कायम ठेवले. संस्कृती जोपासण्याचा आणि संवर्धित करण्याचा आदर्शच त्यांनी घालून दिला. आयुष्यभर ज्ञानसाधना, परिश्रम, संस्कृतीरक्षण करून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. मराठवाडा मित्र मंडळ, पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी शोधनिबंध असो, की एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन त्यांनी केले.

पुण्यात शिक्षणासाठी येणाऱया मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांना त्यांचा आधार होता. 2011 साली मराठवाडा मित्र मंडळाने डॉ. नागनाथ बिराजदार यांना मानपत्र देऊन सन्मान केला. वयाच्या 90 वर्षांपर्यंत ते कार्यरत राहिले. त्यांच्या निधनाने मराठवाड्याचा मित्र आणि वनस्पतीशास्त्रा विषयातील ज्ञानतपस्वी काळाच्या पडद्याआड गेला. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना डॉ. नागनाथ बिराजदार यांची पोकळी सतत जाणवत राहील.

– मेधा पालकर