Nagar News – नगर-सोलापूर महामार्गावर अवाजवी प्रमाणात टोल वसुली, नागरिकांमध्ये तीव्र संताप

fastag-toll-plaza

नगर-सोलापूर महामार्गावर अवाजवी प्रमाणामध्ये टोल वसुली सुरू असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी या प्रकरणांमध्ये तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी कर्जतसह मिरजगाव येथील जनतेने केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय राज्य महामार्गांची कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्ते विकास विभागामार्फत हाती घेण्यात आली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर काही कामे रखडलेली आहेत. नगर-मनमाड महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. नगर-सोलापूर महामार्ग हा नव्याने तयार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही महामार्गाचे काम पूर्णत्वाला गेलेले नाही. मात्र हा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच या महामार्गावरील टोल वसुलीचा विषय सध्या गाजू लागला आहे. नगर-सोलापूर महामार्गावर असलेल्या मिरजगाव व अन्य गावांमधील रहिवाशांना या टोलचा मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. नगर व कर्जतमधील लोकांना या महामार्गावरुन प्रवास करताना अवाजवी रक्कम टोलच्या माध्यमातून द्यावी लागत आहे.

नगर मिरजगाव हे अंतर अवघे 50 किलोमीटर आहे. मात्र यासाठी जाऊन येऊन 260 रुपयांचा टोल भरावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संतापाचे वातावरण आहे. एकीकडे रस्ते चांगले करणे ही सरकारची जबाबदारी असताना दुसरीकडे मात्र जनसामान्यांच्या पैशाला अशा पद्धतीने कात्री लावली जात आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर या संदर्भामध्ये चांगला संघर्ष हा उभा ठाकलेला आहे. या संदर्भामध्ये आता खासदार निलेश लंके यांनी तत्काळ लक्ष देऊन आगामी काळामध्ये टोल वसुली कशा पद्धतीने थांबवता येईल याकरता लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी आता कर्जत व मिरजगाव परिसरातील नागरिक करू लागले आहेत. या संदर्भामध्ये जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही, तर वेळप्रसंगी आंदोलन उभारता येईल का या दृष्टिकोनातून पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे.