राज्यात मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळला. पावसाने रौद्ररूप धारण करून फक्त 24 तासांत 14 इंच पाऊस कोसळला आहे.
गेल्या शनिवारपासून तालुक्यातील कळसूबाई, हरिश्चंद्रगडासह भंडारदरा धरण पाणलोटात पावसाने कमबॅक केल्यानंतर अक्षरशः थैमान घातले आहे. सोमवारपासून कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरासह भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस पडला. मंगळवारी घाटघर परिसरात 11 इंचाहून अधिक पाऊस झाला. पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. बुधवारी तर घाटघर येथे ढगफुटीच झाली. 24 तासांत तब्बल 14 इंचाहून अधिक पाऊस परिसरात झाला. या प्रमाणेच पांजरे व रतनवाडीमध्येही 13 इंच पाऊस पडला.
मंगळवारपासून सुरू असलेला पाऊस थांबलाच नाही. पण बुधवारच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याचे दिसून आले. भंडारदरा धरणातील उन्नेन विहीरीतून बुधवारी दुपारी 12 वाजता भंडारदरा धरणाखालील हायड्रो विद्युत गृह क्रमांक एकमधून 835 क्युसेक्सने वीज निर्मितीस विसर्ग देण्यात आला. बुधवारी सायंकाळनंतर भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन तो 85 टक्क्यांवर पोहचला आहे. आता नवीन आलेल्या जलाशय परीचलण सूचनेनुसार भंडारदरा धरणात 9 हजार दलघफूट एकूण पाणीसाठा झाल्यावर धरणाच्या सांडव्या जवळील लोखंडी वक्राकार दरवाजे वर उचलून (स्पिलवेमधून) प्रवरा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहीती जलसंपदाचे सहाय्यक अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.
आढळा नदी वाहती, तवा प्रवाहीत
आढळा परिसरातील आढळा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेले दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पावसाच्या सरी बरसत असल्याने सांगवी लघु प्रकल्प भरून वाहू लागला आहे. त्यामुळे आढळा नदीचे पाणी देवठाण येथील मध्यम प्रकल्पामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान या नदीवर सावरगाव पाटजवळ असलेला तवा धबधबा कोसळू लागला आहे. अत्यंत नयनरम्य असे दृश्य आता पर्यटकांसाठी खुणवू लागले आहे.
अकोले तालुक्यातील अढळा परिसरात दरवर्षीच पावसाचे आगमन उशिरा होत असते. यावर्षी मात्र योग्यवेळी पावसाचे आगमन झाल्याने चार-पाच दिवसांपासून परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहे .यामुळे आढळा मध्यम प्रकल्पावर असलेले सांगवी व पाडोशी लघु प्रकल्प नुकताच भरला आहे . देवठाण प्रकल्पामध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. देवठाण मध्यम प्रकल्पाची क्षमता 1060 दशलक्ष घनफूट इतकी आहे. त्यापैकी गुरुवारी सकाळपर्यंत सव्वा सहाशे इतका पाणीसाठा धरणात साठवला गेला होता. पाडोशी लघु प्रकल्पाचे पाणी साठवण क्षमता 146 दसलक्ष घनफूट इतकी आहे, तर सांगवी लघु प्रकल्पाची 71 दशलक्ष घनफूट इतकी आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.