छोटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या नगर-पुणे महामार्गावरील छोटे पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्ताने आज बुधवार, 17 जुलै रोजी लाखो भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. या आषाढीनिमित्त बुधवार, रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास दहा लाख भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरासह संपूर्ण पंढरपूर फुलून गेले होते.
आषाढी एकादशीनिमित्त छोटे पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात बुधवारी रात्री 12 वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर पहाटे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे व पत्नी या दाम्पत्याच्या हस्ते पाद्यपूजन करून अभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, अप्पासाहेब झळके, रत्नाकर शिंदे आदींची उपस्थिती होती.
पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे शेकडो दिंड्या दाखल झाल्या होत्या. दिंडीतील वारकर्यांना गर्दीचा सामना करावा लागू नये, यासाठी दिंडी मार्ग वेगळा ठेवण्यात आला होता. मात्र, भाविकांच्या अलोट गर्दीमुळे दुपारनंतर दोन्ही मार्गांवर भाविक वारकर्यांनी गर्दी केली होती. मंगळवार रात्री 12 ते बुधवार रात्री 12 वाजेपर्यंत जवळपास 10 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर संस्थानचे राजेंद्र पवार यांनी दिली.
शेकडो दिंड्यांची हजेरी
वारकरी सांप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन शेकडो दिंड्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाचा गजर करीत दाखल झाल्या. रांजणगाव फाटा ते तिरंगा चौक, गोलवाडी फाटा ते विठ्ठल मंदिर, वाळूज ते विठ्ठल मंदिर या चारही बाजूंचे महामार्ग वारकरी व भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. यावेळी शहरासह ग्रामीण भागातील शेकडो ठिकाणांहून दिंड्या दाखल झाल्या होत्या.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, कृष्णचंद्र शिंदे, अविनाश आघाव, ब्रह्म गिरी, जयंत राजुरकर, संगीता मिसाळ, गीता बागवडे, राजश्री आडे, राजेंद्र सहाणे, सोमनाथ जाधव, दिलीप तारे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, संदीप यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांसह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वारकर्यांना ठिकठिकाणी चहा – पाणी, फराळ वाटप
पंढरपुरात येणार्या विठ्ठलभक्त वारकर्यांसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांकडून फराळाचे स्टॉल्स लावण्यात आले होते. बाबा पेट्रोलपंप ते तिरंगा चौक, लिंबेजळगाव ते पंढरपूर, रांजणगाव फाटा ते तिरंगा चौक, तीसगाव चौक, बजाजनगर, वळदगाव, वाळूज गाव या मुख्य रस्त्यांवर शेकडो स्वयंसेवी संस्था, उद्योजक व पक्षांच्या वतीने साबुदाणा खिचडी, फळ वाटप, चहा, मसाला दूध, पाणी, राजगिर्याचे व शेंगदाण्याचे लाडू इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.