सध्या राज्यामधील तरुणांची परिस्थिती पाहता लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पैसे देऊन मध्यस्थाच्या मदतीने लग्नाची जुळवाजुळव करण्यास प्राधान्य दिले जात आहे. परंतु तरुणांच्या याच परिस्थितीचा गैरफायदा उचलण्याचे काम काही भामटे करत आहेत. असाच प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला असून एका तरुणाला याचा चांगलाच फटका बसला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील तरुण नितीन अशोक ओगले याचे लग्न सिमरन गौतम पाटील (यवतमाळ) या तरुणीशी सचिन जाधव यांनी मध्यस्थी करत 2 लाख 30 हजार रुपये रोख घेऊन जुळवून आणले. त्यानुसार 26 जून 2024 रोजी कोळगाव साकडेवाडी येथील दत्त मंदीरात नितीन आणि सिमरन यांचा विवाह संपन्न झाला. लग्नाची नोटरी करण्यासाठी आज (28 जून 2024) नितीन व सिमरन यांच्या सोबत अशोक हरिभाऊ ओगले, लंकाबाई अशोक गोगले आणि सिमरनची आई आशा ही सर्व मंडळी न्यायालयात ऍड. अक्षय जठार यांच्याकडे आले होते.
याचवेळी सिमरन व तिच्या आईला घेऊन जाण्यासाठी शेख शाहरुख व दीपक पांडुरंग देशमुख हे दोघे एर्टिगा गाडी (MH26AK1356) घेऊन न्यायालयाजवळ हजर झाले होते. संधी साधत सिमरनची आई आशा गौतम पाटील हिने पिशवीतून मिरची पावडर काढत मुलाच्या आईच्या डोळ्यात फेकली आणि तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगवधन दाखवत ऍड.अक्षय जठार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ गाडी आडवली व सर्वांना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. अशोक हरिभाऊ ओगले यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सिमरनचे 9 वे लग्न असल्याची माहिती तपासात उघड झाली.