नोटिसा बजावल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले, सोनई ते घोडेगाव कुकाणा रस्त्यावरील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई

शनिशिंगणापूर राहुरी राष्ट्रीय मार्गालगत असलेल्या सोनई ते घोडेगाव कुकाणा रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे अतिक्रमण हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने लेखी नोटिसा बजावल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत कच्ची पक्की बांधकामे व टपऱ्यांच्या अतिक्रमणांवर हातोडा पडणार असल्याने व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

राहुरी-शनिशिंगणापूर हा राष्ट्रीय महामार्ग चार ते पाच वर्षांपूर्वी तयार केला गेला. हा महामार्ग शिर्डी-शनिशिंगणापूर भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 111 कोटी रुपये खर्चुन बनवला. काँक्रिटीकरण असलेला रस्ता अत्यंत निकृष्ट स्वरूपाचा बनवल्याने या रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदाराविरोधात केंद्रीय पातळीवर तक्रारी दाखल केल्या गेल्याने हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. परिणामी या रस्त्याचे अंतर राजकीय दबावापोटी कमी-जास्त करण्यात आल्याने या मार्गावर पुन्हा अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. असे असताना आता शनिशिंगणापूर रस्त्याला जोडून असलेला सोनई-घोडेगाव चांदा कुकाना राष्ट्रीय मार्ग क्रमांक 66 या नवीन मार्गाचा समावेश केला आहे. या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.

सोनई-घोडेगाव चांदा कुकाना या मार्गावरील दोन्ही बाजूंची कच्ची पक्की बांधकामे टफ्ऱ्यांची अतिक्रमणे स्वतःहून हटवण्यात यावीत, यासाठी वेळोवेळी बांधकाम खात्याने नोटीस बजावली आहे. मात्र, अतिक्रमणधारकांनी याकडे दुर्लक्ष केले. नुकत्याच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा नेवासा फाटा, कुकाना सार्वजनिक बांधकाम उपविभाग अतिक्रमणविरोधी पथकाने अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. नेवासा सार्वजनिक बांधकाम खात्याने अतिक्रमणविरोधात मोठी मोहीम उघडल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

चार दिवसांची मुदत

सार्वजनिक बांधकाम उपविभाग नेवासा यांनी 6 फेब्रुवारी रोजी सोनई घोडेगाव रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमध्ये चार दिवसांची मुदत दिली असून, त्या व्यावसायिक व अतिक्रमणधारकांचे सातबारा उतारा, मालमत्तापत्रक कार्यालयात सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत; अन्यथा शासनामार्फत अतिक्रमणे काढली जातील. यावेळी खर्चाची वसुली महसूल जमीन थकबाकी सक्तीने वसूल केले जाईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

शनिशिंगणापूर-राहुरी महामार्गावर हातोडा पडणार का?

सध्या नेवासा तालुक्यात अतिक्रमणविरोधी मोहीम जोरात सुरू असून, सोनई-घोडेगाव अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, शनिशिंगणापूर-राहुरी महामार्गावरील अतिक्रमण काढणार का, हा प्रश्न उपस्थित झाला असून, या महामार्गावरील अतिक्रमणधारकांना अद्यापि नोटिसा बजावल्या नाहीत. तरीही अतिक्रमणांवर हातोडा पडणार, या भीतीने सोनईतील अतिक्रमणधारक व्यावसायिकांची भीतीने गाळण झाली आहे.

उपअभियंता व व्यावसायिकांमध्ये चर्चा

सोनईअंतर्गत रस्त्याची अतिक्रमणे हटवणार असल्याने खरवंडी, मोरया चिंचोरे, सोनई, गणेशवाडी आदी ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणार, अशी चर्चा होत असताना, नेवासा बांधकाम विभागाचे उपअभियंता डुबाले यांच्या कार्यालयात सोनईमधील व्यावसायिक प्रकाश शेटे व डॉ. रामनाथ बडे यांनी चर्चा केली. यावेळी गावातील अंतर्गत अतिक्रमणे हटवल्यास सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. यासाठी शासनाने व बांधकाम खात्याने अंतराची मर्यादा कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

50 फूट अंतर

अतिक्रमणधारकांनी रोडवर अतिक्रमण केल्याने रस्त्याच्या मध्यापासून 50 फूट अंतरावरील अतिक्रमणे हटवली जाणार असून, यामध्ये कच्ची पक्की बांधकामे व टपऱ्या तोडल्या जाणार आहेत. रस्त्याचे अंतर मध्यापासून 50 फूट असल्याचे अधिकारी सांगतात. यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवले जाणार असल्याने खरोखरच रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत.