Nagar News – साईमंदिर परिसराची सर्व प्रवेशद्वारे खुली करा…अन्यथा आंदोलन करणार; शिर्डी ग्रामस्थांचा इशारा

शिर्डीची बाजारपेठ उद्धवस्त करण्यात तसेच भाविक व ग्रामस्थांना छळण्यात पुर्वीच्या अधिकाऱ्यांना असुरी आनंद मिळत होता, त्यासाठीच कोविडपासून परिसराच्या गेटवर निर्बंध आणण्यात आले. आता संस्थानने चारही गेट आत आणि बाहेर जाण्यासाठी सुरू करावे, अन्यथा पंधरा दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आज निघालेल्या ग्रामस्थांच्या मोर्चात देण्यात आला.

साईमंदिर परिसराचे गेट पुर्वीप्रमाणे आतमध्ये आणि बाहेर जाण्यासाठी खुले करावे, गेटवर पेडपास आणि लाडु कांऊटर सुरू करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच या मागण्यांबरोबरच शिर्डीत सुरक्षेसाठी सीआयएसएफ जवानांची नियुक्त करण्याची गरज नसल्याची भावनाही या मोर्चात नागरिकांनी व्यक्त केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास मारुती मंदिराजवळून शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत पालखी रस्त्याने जावून मंदिर परिसराला प्रदाक्षिणा घातली. यावेळी मंदिर परिसरालगतच्या साईकॉम्प्लेक्सच्या व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवून चारही गेट सुरू करण्याच्या मागणीचे समर्थन केले.

शिवसेना कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, रमेशराव गोंदकर, सुधाकर शिंदे, निलेश कोते, नितीन कोते, अमृत गायके, विकास गोंदकर, महेंद्र शेळके, संदीप सोनवणे, दत्ता कोते, अशोक पवार, संग्राम कोते, योगेश गोंदकर, गणीभाई पठाण, रविंद्र गोंदकर, संदीप पारख, दिपक वारूळे, किशोर गंगवाल, ताराचंद कोते, अरविंद कोते आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी ग्रामस्थांच्या एका गटाने याच मागणीसाठी मोर्चा काढला होता.