सौंदाळा गणपती मूर्ती चोरीप्रकरणी एक ताब्यात

तालुक्यातील सौंदाळा गणपती मूर्ती चोरी प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्याच्या पथकाने एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरलेली चार हजार रुपये किमतीची गणपती मूर्ती ताब्यात घेण्यात आली. नवनाथ कडू (रा. बाभूळखेडा) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. संजय आरगडे यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

सौंदळा येथील मंदिरातील दि. 3 जानेवारी रोजी गणपती मूर्ती चोरीला गेलेली होती. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन नेवासा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मंदिर परिसर आणि सौंदळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या दिवशी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास एक संशयित सिटी हंड्रेड नेवासा पोलिसांची कामगिरी दुचाकीवर संशयतरीत्या जात असल्याचे दिसून आले होते.

मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी संशयित नवनाथ कडू याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदर गुन्ह्याची कबुली देत चोरलेली गणपतीची मूर्ती देखील काढून दिली, तर नवनाथ कडू हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे व त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, सौंदळ येथील गणपती मूर्ती चोरीप्रकरणी ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्याने त्यांनी 24 जानेवारी रोजी कुकाना पोलीस दूरक्षेत्रासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, तत्पूर्वीच मूर्ती चोरीचा छडा लागल्याने सौंदाळा ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तपास करीत आहेत.