Nagar News – नेवासा शहरात अग्नितांडव; नगरपंयातीकडे अग्निशमन यंत्रणा नसल्याने मोठे नुकसान

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपंचायत चौकात शुक्रवारी (26 जुलै) रात्री दीड ते दोनच्या सुमाराल भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे नगरपंचायतीकडे अग्निशमन व्यवस्था नसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. साखर कारखान्याचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाल्यामुळे, अखेर सात तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

नेवासा शहरातील मध्यवर्थी ठिकाणी असलेल्या नगरपंचायत चौकात शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्या ठिकाणी उपस्थित तरुणांच्या सदर गोष्ट लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा करत इतरांना बोलावून घेतले. तसेच काही जणांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याशी संपर्क साधला. धनंजय जाधव यांनी तात्काळ ज्ञानेश्वरी सहकारी साखर कारखाना (भेंडा), मुळा सहकारी साखर कारखाना (सोनई) यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर कारखान्याचे अग्न्निशामन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत 15 दुकाने जळून भस्मसात झाली होती. या आगीमध्ये जनावरांचे खाद्य दुकान, फुटवेअर, बेकरी, जनरल स्टोअर, फुल भांडार आणि हेअर सलून या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे सात तासानंतर ही आग विझवून आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. नेवासा नंगरपंचायतीकडे अग्निशमन बंब असता तर आग वेळीच आटोक्यात आणता आली असती, व्यापाऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात टाळता आले असते. असा आरोप नागरिकांनी केला आहे. दुकानदार प्रकाश साळुंके यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या जळीत प्रकरणात सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसे पंचनामे महसूल विभागाने केले असून शासनाला ते त्वरित पाठवण्यात येणार आहेत, असे नायब तहसिलदार चांगदेव बोरुडे यांनी सांगितले. तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणारी नुकसान भरपाई पीडितांना प्राप्त होईल. असे सुद्धा सांगण्यात आले आहे. माजी नगरसेवक संजय सुखदान यांनी आगीमध्ये नुकसान झालेल्या सर्व दुकानदारांना मदतीसाठी वैयक्तिक 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच नागरिकांनी सुद्धा पुढे येऊन पीडितांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.