![dindori police station](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/dindori-police-station-696x447.jpg)
आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शिर्डीत उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाला आईनेच प्रियकराच्या मदतीने संपवले. मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह गाठोड्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिला. घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी माता आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
शिर्डी तालुक्यातील साकोरे मिग येथील कार्तिक ज्ञानेश्वर बदादे हा चार वर्षाचा बालक 20 डिसेंबर 2024 रोजी बेपत्ता झाला. कार्तिकच्या वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला असता गोदावरी पात्रात गाठोड्यात बांधलेला एक मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह कार्तिकचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात एक पुरुष आणि एक महिला स्कूटरवरून एक गाठोड घेऊन जाताना आणि येताना रिकाम्या हाती परतताना दिसले. पोलिसांनी कार्तिकच्या आईला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीअंती सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आईच्या प्रियकराला अटक केली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.