मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाटातील पाण्यात बुडालेल्या सावित्रीबाई फुले विद्यालयाचा विद्यार्थी संकेत श्रीपत तरटे (वय 15) या विद्यार्थ्याचा मृतदेह आज सकाळी सापडल्याने बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेली शोधमोहीम थांबविण्यात आली. मुलाचा मृतदेह पाहून आई-वडील तसेच नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात आवर्तन सुरू असल्याने 1500 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. बुधवारी (दि. 8) सायंकाळी सावित्रीबाई फुले विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारे संकेत तरटे, ओम जगदाळे, युवराज मोरे, तेजस कांदे तसेच आणखी एकजण असे पाच विद्यार्थी कृषी विद्यापीठ ते मुळाधरण मार्गावरील गावडे वस्तीजवळील उजव्या कालव्याच्या पाटात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी चौघे मित्र पाण्यातून बाहेर पडण्यास यशस्वी झाले. मात्र, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे संकेत तरटे हा वाहून गेला होता.
या घटनेची माहिती मिळताच, कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सुरक्षारक्षकांना घेऊन घटनास्थळी धाव घेत मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी पाटबंधारे विभागास सूचना देऊन उजव्या कालव्याचे पाणी आवर्तन 400 क्युसेकपर्यंत कमी केल्याने सुरक्षारक्षकाकडून शोधमोहिमेस सुरुवात करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत बॅटरीच्या उजेडात मुळा उजव्या कालव्याच्या उंबरे हद्दीपर्यंत शोध घेण्यात आला. मात्र, संकेत सापडला नाही.
आज सकाळपासूनच पुन्हा सुरक्षारक्षकांच्या मदतीने सोनई हद्दीपर्यंत शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र, ती व्यर्थ ठरली. दरम्यान, गावडेवस्तीजवळ पाटातील पाण्यात अँगलला अडकलेला संकेतचा मृतदेह आढळला. राहुल गायकवाड, म्हाळू हळोनोर, अविनाश भिंगारदे, सोनू कोकाटे, अक्षय गोसावी या तरुणांनी मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. राहुरी येथे शवविच्छेदनानंतर संकेतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने राहुरीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
तेजस कांदेला वाचविण्यात यश
तेजस कांदे व संकेत तरटे या दोघांना पाण्यात पोहता येत नव्हते. पाण्यात उडी मारताच दोघे बुडू लागले. त्यांनी ‘वाचवा… वाचवा’ म्हणून आरडाओरडा केला. यावेळी पाटाजवळच राहणारे प्रशांत गावडे, भानुदास रोडे, अजय गावडे या तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन बुडत असलेल्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तेजस कांदेला बाहेर काढून तत्काळ अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याने तो बचावला. मात्र, संकेत तरटे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता.