
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शहर हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. त्याच्या नोटिसा नागरिकांना मिळाल्या आहेत. अनेकांच्या घरांवर व दुकानांवर प्रशासनाने लाल रंगाच्या खुणा केल्या आहेत. हे सर्व अन्यायकारक नियमबाह्य आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम सहा महिने थांबवावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अतिक्रमण काढण्यापूर्वी अतिक्रमणधारकास म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, त्याच्या ताब्यात असलेल्या जागेच्या लगतच्या रस्त्यातील रुंदी डी. पी. प्लॅनप्रमाणे असल्याची खात्री करावी. कोपरगावात महाशिवरात्रीचा उत्सव असतो. सध्या 10वी व 12वीच्या परीक्षा सुरू असून, या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची भीती आहे.
पवित्र रमजान महिन्याची 1 मार्च पासून सुरुवात होत आहे. यापूर्वी सन 2011 साली विस्थापित केलेल्या भूमिपुत्रांचे आधी पुनर्वसन करावे. त्याशिवाय अतिक्रमण कारवाई करू नये, असे महाविकास आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात यावी, अतिक्रमणात विस्थापित होणाऱ्या व्यावसायिकांना नगरपालिकेच्या जागेवर खोका शॉप बांधून द्यावे व त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमण मोहीम राबविताना त्याची सुरुवात महात्मा गांधी प्रदर्शन संचालित साई तपोभूमी शॉपिंग सेंटरवरील अतिक्रमणापासून करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.
या निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, संदीप वर्षे, माजी नगरसेवक योगेश बागुल, इरफान शेख, शेखर कोलते, तुषार पोटे, शहरप्रमुख सनी वाघ, अतुल काले, उमेश धुमाळ, स्वप्नील पवार, बाळासाहेब साळुंके, जितेंद्र रणशूर, प्रफुल्ल शिंगाडे, अंकुश वाघ, गौतम पवार, नितीन बनसोडे, नितीन शिंदे, अनिल आव्हाड, शरद खरात, सिद्धार्थ शेळके, राहुल देशपांडे यांच्या सह्या आहेत.