श्रीरामपूर तालुक्यात थैमान घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मात्र दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी दरोडेखोरांकडून 4 लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
श्रीरामपूर ताल्याकातील बेलापूर पढेगांव रस्त्यावरील काळभैरवनाथ मंदीराच्या रोडलगत अंधारात दरोडेखोर दबा धरून बसल होते. पोलिसांनी साफळ रचत त्यांना जेरबंद केले, मात्र या झटापटीत दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत स्वरुप ऊर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे, दऱ्या बरांड्या भोसले, आजब्या महादु भोसले, कुलत्या बंडु भोसले, सर्व (रा. अंतापुर, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पळून गेलेल्या संशयीतांची नावे रवि ऊर्फ रविंद्र मुबारक भोसले, सोहेल पठाण दोन्ही (रा. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत.
दरोडेखोरांकडून 70 हजार रुपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाची बोरमाळ, 70 हजार रुपये किंमतीचे लॉकेट, 42 हजार रुपये किंमतीची सहा ग्रॅम वजनाची नथ, 35 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची अंगठी, 1 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, 2 हजार रुपये किंमतीची 1 तलवार, 2 हजार रुपयांची एअर पिस्टल, 1 कटावणी, 1 रामपुरी चाकु असा एकूण 4 लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नेवासा व श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केले असल्याची कबुली दिली.
ताब्यात घेतलेला कुलत्या बंडु भोसले हा सराईत गुन्हेगार असून याच्याविरुध्द दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. तसेच स्वरुप ऊर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे याच्याविरुध्द 15, दऱ्या बरांड्या भोसले याच्याविरुद्ध 3, आजब्या महादु भोसले याच्याविरुध्द 3 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने केली.