Nagar News – कोपरगाव आगाराला पांडूरंग पावला, आषाढी वारीतून 19 लाखांचे उत्पन्न

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. कोपरगाव आगाराच्या एकूण 30 बसेसचा यामध्ये समावेश होता. या 30 बसेसच्या माध्यमातून 7 ते 21 जुलै या 14 दिवसांच्या कालावधीत कोपरगाव आगाराला सवलतींसह एकूण 19 लाख 7 हजार 647 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्रीविठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनाला लाखो वारकरी पायी जातात, मात्र ज्यांना पायी जाणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी एसटी महामंळाच्या बसचा पर्याय उपलब्ध असतो. कोपरगाव बसस्थानकातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार 30 बसेस कोपरगाव आगारातून सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोपरगाव आगाराला एकूण 19 लाख 7 हजार 647 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दोन लाख रुपयांचा नफा आगाराला यावर्षी झाला आहे. अशी माहिती आगारप्रमुख अमोल बनकर यांनी दिली. तसेच माहे जूनमध्ये कोपरगाव आगाराला समन्वय मूल्य पकडून 25 लाख रुपयांचा नफा झाला आणि आगार प्रथम क्रमांकावर आले असल्याचे, अमोल बनकर यांनी सांगितले.

कोपरगाव बस आगाराला 40 इलेक्ट्रिकल नव्या बस मिळणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 180 बस गाड्या येणार आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.