
जिल्ह्यात सरकारी टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठा नियोजनात आणखी सुसूत्रता व पारदर्शकता आणावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘जलदूत’ अॅप तयार करण्यात येत आहे. या अॅपच्या माध्यमातून येत्या उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या अॅपचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. हे अॅप कार्यान्वित झाल्यावर त्याद्वारे सरकारी पाण्याच्या टँकरचे नियोजन करण्यात येणार आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊन फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. यामुळे लवकर काही तालुक्यांतून पाण्याच्या टँकरची मागणी होणार आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यात शासकीय टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठा नियोजनात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘जलदूत’ अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून यंदा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. अॅपचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच पालकमंत्री यांच्या मान्यतेने ते कार्यान्वित करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात दरवर्षी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण समाधानकारक असले, तरी उन्हाळ्यात पाथर्डी, संगमनेर, कर्जत, जामखेड, पारनेर या तालुक्यांत पाणीटंचाई जाणवू लागते. ग्रामीण भागातील जनतेशी पाण्याची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला खासगी तसेच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. जिल्ह्यात मागील वर्षी 150 अधिक टँकर सुरू होते. टँकरद्वारे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता यावी, यासाठी ‘जीपीएस’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये आणखी सुसूत्रता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‘जलदूत’ अॅप विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत कार्यान्वित होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
काम अंतिम टप्प्यात
‘जलदूत’ अॅपच्या माध्यमातून टँकर मंजुरीचे प्रस्ताव, मान्यता तसेच मंजूर झालेल्या टँकरचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये जिल्ह्यात तालुकानिहाय मंजूर होणारे टँकर, त्यांच्या खेपांसह अन्य माहिती ऑनलाइन अपलोड केली जाणार आहे. यातून टँकर खेपांमध्ये पारदर्शकता येणार असून, कागदोपत्री खेपा दाखवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना चाप बसणार आहे. अॅप परिपूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार
‘जलदूत’ अॅप तयार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्या संपर्क क्रमांकासह इतर माहिती भरली जात आहे. हे जलदूत अॅप कार्यान्वित होण्यापूर्वी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, जिल्हा प्रशासनाकडील टंचाई विभाग एकत्रित या अॅपच्या माध्यमातून खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.